औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली. जिल्ह्यात 44 हजार 59 परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 43 हजार 549 परीक्षार्थिंनी 1130 केंद्रांवर परीक्षा दिली असून, एक हजार 510 परीक्षार्थिंनी दांडी मारली.
कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने पूर्ण तयारी केली होती. मंगळवारी पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांना केंद्रांवर सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींची कसून तपासणी करून त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात येत होते. बहुतांश शाळांनी स्पीकरवरून विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात होत्या. परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जात होती. आवश्यक असलेल्या केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दहावी बोर्डासाठी जिल्ह्यात 1130 केंद्रावर परीक्षा सुरु झाली असून यात 224 मुख्य केंद्र व 906 उपकेंद्रांचा समावेश आहे. परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी विविध पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शहरासह जिल्हास्तरावर सहा आणि तहसीलदार, बीडिओ यांच्या अधीनस्थ भरारीसह बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.