निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्या नेमणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नेमणूका देशाचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI मिळून करतील. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचा या खंडपीठात समावेश आहे

लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेची शुद्धता राखली पाहिजे असं यावेळी न्यायमूर्ती केएम जोसेफ यांनी म्हंटल. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते. मात्र आता देशातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमसारखे स्वतंत्र पॅनल स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

त्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची सध्याची प्रक्रिया रद्द केली जाईल. निवडणुक आयोगाच्या नियुक्तीसाठी समिती गठीत करण्यात येईल. तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजाला कार्यकारी हस्तक्षेपापासून वेगळे करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय निवडणूक आयुक्तांना सीईसी सारखीच सुरक्षा देण्यात यावी. ते सरकार काढूही शकत नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायमूर्तीनी केली.