हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहिणीची छेड काढल्याचा राग मनात ठेऊन एकाची निर्घृण हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. निलगिरी बाग परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी संशयित आरोपी अमोल साळवे याला पोलिसांनी बेडया ठोकल्या असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात राहणारा विकास नलावडे हा वारंवार संशयित आरोपीच्या बहिणीची छेड काढत होता. यावरून यापूर्वी सुद्धा संशयित आरोपी साळवे व नलावडे यांच्यात वाद झाले होते. त्यातच बुधवारी (ता.२२) रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नलावडे याने संशयित साळवे यास निलगिरी बाग येथील बिल्डिंग न.५ जवळ असलेल्या पटांगणात भेटावयास बोलावले आणि मीच तुझ्या बहिणी सोबत लग्न करेन, असे सांगितले.
त्यांनतर राग अनावर झाल्याने अमोल साळवे आणि त्याच्या सहकारी मित्राने विकास नलावडेवर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. विकास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना एका नागरिकाने पाहिले आणि त्याला डॉ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विकासचा मृत्यू झाला. यांनतर आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि संशयित आरोपी आणि त्याचा साथीदार यांना अटक केली आहे.