कराडात दोन चिमुकल्यांची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून आईने स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराड शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून आईची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालेल्या पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याची चिट्ठी संबंधित महिलेने लिहून ठेवली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. अनुष्का आवटे व लहान मुले हर्षद व आदर्श अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील वाखान परिसरात हे कुटुंब वास्तव्यास होते. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यानंतर पत्नीसह दोन मुले त्याठिकाणी राहत होती. मात्र, पतीच्या निधनामुळे आपण व्यथित झालो असून त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून ठेवून संबंधित महिलेने बुधवारी दुपारी विषारी औषध प्राशन केले. तसेच स्वतःच्या हाताची नाडी कापून घेतली.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी घरात धाव घेतली. त्यावेळी महिलेची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. तर महिलेची प्रकृती गंभीर होती. नातेवाईकांनी तातडीने तिला कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलांचा गळा दाबून मी स्वतः आत्महत्या करीत आहे, असे त्या महिलेने चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

You might also like