हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या चीनमध्ये (China) फेब्रुवारी महिन्यापासून श्वसनासंबंधी एका गंभीर आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे मृत्यू होत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांचा ताण वाढला आहे. इतकेच नव्हे तर, मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने अंत्यसंस्काराच्या सोयींसाठीही मोठी अडचण निर्माण झाली आहे.
चीनमध्ये पसरलेल्या या नव्या आजारामुळे बीजिंग आणि अन्य मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक ठिकाणी लोकांना उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू होत असल्याचीही प्रकरणे समोर येत आहेत. मात्र उत्तर चीनमधील हेबेई प्रांतात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. मृतदेह वाढल्याने ताबूतही उपलब्ध नाहीत, आणि जे उपलब्ध आहेत त्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, या आजाराची लक्षणे कोविड-19 सारखीच आहेत. खोकला, श्वास घेण्यास अडचण आणि दीर्घकाळ टिकणारा ताप अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. गावकरी आणि स्थानिक नागरिकांच्या मते, या आजारावर कोणतेही औषध प्रभावी ठरत नाही. वृद्ध आणि लहान मुलांमध्ये मृत्यूदर अधिक आहे. काही नागरिकांनी दावा केला आहे की, सरकार या परिस्थितीची खरी माहिती लपवत आहे.
या आजाराच्या पार्श्वभूमीवर, चीनमधील वैज्ञानिकांनी ‘HKU5-Cov2’ नावाच्या नव्या विषाणूचा शोध लावला आहे. हा विषाणू कोविड-19 प्रमाणेच असून जनावरांमधून माणसांमध्ये पसरत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या संशोधनानुसार, हा विषाणू भविष्यात आणखी धोकादायक ठरू शकतो. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, चीन सरकारने या आजाराशी संबंधित पारदर्शकता ठेवावी, नागरिकांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, आणि गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळेल याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कारण, स्मशानभूमी आणि कब्रस्तानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार सुरू असले तरी अधिकृत आकडेवारी मात्र कमी दाखवली जात आहे.