हॅलो महाराष्ट्र । जत प्रतिनिधी
पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे डिजिटल पत्रकारितेमुळे झाले. डिजिटल पत्रकारिता ही आजच्या युगाचे एक प्रभावी माध्यम आहे. डिजिटल पत्रकारितेने नागरिक पत्रकारितेला बळ दिले. या पत्रकारितेमुळे प्रत्येक व्यक्ती हा एक जागरूक भारतीय नागरिक बनून समाजामध्ये विधायक बदल घडवू शकतो, असे प्रतिपादन प्राध्यापिका स्नेहल वरेकर यांनी केले.
“डिजिटल पत्रकारितेचे स्वरूप, प्रक्रिया व डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात असणाऱ्या रोजगाराच्या संधी” याविषयी वरेकर यांनी राजे रामराव महाविद्यालय जत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गुरुवार, दि. 2 मार्च 2023 रोजी राजे रामराव महाविद्यालय जत, अग्रणी महाविद्यालय योजना, हिंदी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल पत्रकारिता: स्वरूप, प्रक्रिया व रोजगाराच्या संधी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील प्रा. स्नेहल वरेकर या उपस्थित होत्या.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकारिता म्हणजे काय?, पत्रकारितेमधील विविध विभाग, वितरण व्यवस्था, संपादकीय रचना, बातमी कशी लिहिली जाते, बातमी संपादित करण्याची प्रक्रिया, बदलत्या काळानुसार पत्रकारितेत झालेले बदल, डिजिटल पत्रकारितेचा उदय, डिजिटल पत्रकारिता म्हणजे काय?, डिजिटल पत्रकारिता विस्ताराची कारणे, डिजिटल पत्रकारितेमध्ये कोणकोणत्या बाबी येऊ शकतात, डिजिटल पत्रकारितेचे स्टूल, डिजिटल पत्रकारितेमध्ये असणारे संभाव्य धोके, ट्रोलिं, ब्लॉग राइटिंग, डिजिटल पत्रकारितेनंतरच्या जाहिरात क्षेत्रातील संधी आदि विषयावर विद्यार्थ्यांना सांगोपांग असे मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी डिजिटल पत्रकारितेचे विद्यार्थ्यांना आकलन कशाप्रकारे झाले आहे याविषयी ऑनलाईन फीडबॅक घेतला.
या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, “पत्रकारिता हा लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ मानला जातो. पत्रकारितेचे साधन हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे साधन आहे. पत्रकारिता ही जनतेचा आवाज राज्यकर्त्यांस समोर पोहोचवण्याचे सशक्त माध्यम आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांसाठी ते रोजगाराचेही एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत चालवला जाणारा ‘डिजिटल पत्रकारिता’ हा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करावा.”
यावेळी हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनेल व हिंदी विभाग राजे रामराव महाविद्यालय जत यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यायाकडे करण्यात आले. या कराराद्वारे हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनेल, राजे रामराव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे प्रशिक्षण देऊन पत्रकारिता क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
या कार्यशाळेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर शिवाजी कुलाल, डॉ.भीमाशंकर डहाळके, प्रा. रामदास बनसोडे, डॉ. अशोक बाबुलवार,प्रा.तुकाराम सन्नके, प्रा. राहुल कांबळे, प्रा.अनिल लोखंडे, प्रा. अभयकुमार पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कुमारी भाग्यलक्ष्मी कंगोणे, प्रास्ताविक डिजिटल जर्नालिजम सर्टिफिकेट कोर्स समन्वयक डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी तर आभार हिंदी विभाग प्रमुख तथा अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा. एच.डी.टोंगारे यांनी मानले.