लिफ्टच्या बहाण्याने लॅपटाॅपची चोरी करणाऱ्यास 2 तासात अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे येथून चारचाकी वाहनातून कोल्हापूरला जात असताना शिरवळ येथे एका युवकास लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले होते. परंतु सातारा पोलिसांच्या सतर्कतेने व काैशल्यपूर्ण तपासाने अखेर लॅपटाॅप चोर सापडला. कोरेगाव तालुक्यातील जायगाव येथील एका युवकास अवघ्या दोन तासात पकडले आहे. याप्रकणी अोमकार मनोज जंगम (वय- 23, रा. जयगाव) या संशियत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे येथून कोल्हापूरला सुनील सदाशिव गुरव (रा. संभाजी चौक, प्राधिकरण निगडी, पुणे) हे जात होते. यावेळी शिरवळ येथे अोमकार जंगम याने लिफ्ट मागितली. वाहन मालक सुनिल गुरव यांनी त्यास लिफ्ट देवून सातारा येथे शिवराज पेट्रोलपंप नजीक सोडले होते. सदरचा प्रवाशी हा कार मधून बाहेर उतरल्यानंतर तो लगेचच घाई गडबडीने निघून गेला. यावेळी वाहन मालकास संशय आल्याने त्याने त्याच्या पाठीमागचे सीटवर ठेवलेली सॅक पाहिली असता, त्यामध्ये लॅपटॉप नसल्याचे दिसून आले. सदरचा लॅपटॉप हा 50 हजार रूपये किंमतीचा होता. त्यामध्ये अत्यंत महत्ताचा डाटा असल्याने वाहन मालकाने त्याचा उतरलेल्या ठिकाणी शोध घेतला. परंतू तो प्रवाशी मिळून आला नाही. त्यानंतर वाहन मालक सुनील गुरव यांनी सातारा शहर पोलीस ठाणेस लॅपटॉप चोरीची तक्रार दिली.

सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा शहर डी. बी पथकास संबंधित चोरट्याचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या. डी. बी. पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून सदर परिसराची बारकाईने पाहणी करून तसेच तांत्रिक पुरावा मिळवून संशयिताचे नाव निष्पन्न केले. त्याची अधिक कौशल्यपूर्वक माहिती घेवून त्यास कोरेगाव येथे त्याचे जायगाव गावी जावून त्यास ताब्यात घेतले. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याचेकडे अधिक कसोशीने चौकशी केली असता, त्याने सदरचा लॅपटॉप चोरी करून लपवून ठेवलेबाबत सांगितले. तो पोलीसांनी जप्त केलेला आहे. सदरची कारवाई अवघ्या दोन तासामध्ये करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बोऱ्हाडे, पोलीस उपअधिक्षक मोहन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, पंकज ढाणे, अमय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.