प्रयागराज । अयोध्येतील राम मंदिर बांधकामाचं भूमीपूजन येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध करत एक याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे. यात राममंदिराचं भूमीपूजन म्हणजे अनलॉक 2 च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. याचिकाकर्ता दिल्लीचे पत्रकार साकेत गोखले यांनी हायकोर्टात चीफ जस्टिस यांना लेटर पीआयएलच्या माध्यमातून ही याचिका केली आहे. गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, भूमीपूजन कोविड-19 च्या अनलॉक-2 गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे.
याचिकेत म्हटलं आहे की, अयोध्येमध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 300 लोकं एकत्रित होतील, जे कोविड 19 च्या नियमांच्या विरोधी आहे. यात असं देखील म्हटलं आहे की, या कार्यक्रमामुळं कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्राच्या गाईडलाईन्समधून यूपी सरकारला सूट मिळू शकत नाही. जर ही लेटर पिटीशन मंजूर झाली तर चीफ जस्टिस यांनी नियुक्त केलेल्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होईल. या याचिकेत राममंदिर ट्रस्टसोबत केंद्र सरकारला देखील पक्षकार बनवलं आहे. आपल्या याचिकेत गोखले यांनी बकरी ईदला सामूहिक नमाज करण्याची परवानगी दिली नव्हती, याचा देखील उल्लेख केला आहे. पत्रकार साकेत गोखले यांनी अनेक विदेशी वृत्तसंस्थासाठी काम केलं आहे तसंच सोशल एक्टिविस्ट सुद्धा आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”