हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संपादक मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच पेटलेले आहे. मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील दिसायला सुरुवात झाली आहे. समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी यानंतर मनोहर भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना नवनाथ वाघमारे म्हणाले, मनोहर भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करत असून देशामध्ये अशांतता प्रसरवण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा आम्ही करत आहोत असेही ते म्हणाले.
मनोहर भिडे काय म्हणाले होते?
अमरावती येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील असल्याचे मनोहर भिडे यांनी म्हणले होते. त्याचबरोबर, मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकानं केल्याचा दावा देखील भिडे यांनी केला होता. आता त्यांनी या केलेल्या वक्तव्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ज्यामुळे राज्यातील वातावरण बिघडले आहे. आता देखील त्यांनी थेट महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.