हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अनेक योध्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढाई यशस्वी केली. डॉक्टर, पोलीस, इतर आरोग्यसेवक आणि सामान्य नागरिकसुद्धा या लढाईत प्राणप्रणाने लढत आहेत. कोरोनामुक्तीचा वेगळा पॅटर्न विविध लोकप्रतिनिधी आपापल्या भागात राबवत आहेत. अशाच एका अनोख्या पॅटर्नची गरज आपल्या गावात असल्याची गरज एका चिमुकलीने बोलून दाखवली आहे. मृण्मयी विकास म्हस्के असं बीडमधील आष्टी तालुक्यातील आष्टा गावात राहणाऱ्या या चिमुकलीचं नाव आहे. मृण्मयी सध्या चौथीत शिकत असून तिने आपल्या हाताने आमदार रोहित पवार यांना पत्र लिहीत अनोखी मागणी केली आहे.
“प्रिय रोहितदादा, तुम्ही जामखेडमधून जसा कोरोना घालवला तसा आष्टीमधून पण घालवा ना..” अशी भाबडी मागणी मृण्मयीने रोहित पवारांकडे केली आहे. यात पुढे मृण्मयीने आपल्या वडिलांशी झालेल्या संवादाचा दाखला दिला आहे. तिने वडिलांना विचारलं, “पप्पा, प्रत्येकजण कुणाला तरी घाबरत असतो, तसा कोरोनापण कुणालातरी घाबरत असेलच ना? यावर विकास म्हस्के यांनी “कोरोना रोहितदादाला, डॉक्टरांना आणि पोलिसांना घाबरतो” असं उत्तर दिलं.
रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यानंतर प्रशासन पातळीवर कठोर अंमलबजावणी केल्याने इथला कोरोना नियंत्रणात आला. त्याचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवत मृण्मयीने अनोखी मागणी रोहित पवार यांच्याकडे केली आहे. आता ही मागणी रोहित पवार मनावर घेणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.