हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अकोला शहरात एका नराधमाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तसेच, विरोधकांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घडलेल्या घटनेबाबत निशाणा साधला आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित मुलगी 11 वर्षीय असून ती कैलास टेकडी परिसरात राहते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलीचे आई वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी घरामध्ये शिरला. यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवत पीडितेवर अत्याचार केले. एवढेच करून न थांबता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यामुळे पीडीतेच्या मनात भीती निर्माण झाल्याने तिने आपल्यासोबत होणाऱ्या प्रकाराची बाब कोणाला सांगितली नाही. पुढे जाऊन याच गोष्टीचा फायदा आरोपी घेत राहिला. अखेर त्याची क्रूरता एवढी वाढली की त्याने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिले. त्याचबरोबर, तीचे कात्रीच्या साह्याने केस ही कापले. शेवटी एकेदिवशी या त्रासाला वैतागून पीडित मुलीने आपल्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. यानंतर या दोघांनी आरोपी विरोधात जवळील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सध्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर आरोपी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य म्हणजे, राज्यात अशी धक्कादायक घटना घडल्यामुळे याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी” अशी मागणी त्यांनी केली आहे.