Wednesday, June 7, 2023

पंचायत समितीचा वरिष्ठ लिपिक अडीच हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – फुलंब्री पंचायत समिती च्या वरिष्ठ लिपिकाला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. संजय पांडुरंग सराटे (47, रा. मयूर पार्क, कार्तिकनगर) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदली होती. या विहिरीचे बांधकामही त्यांनी नुकतेच केले होते. या कामाचे पैसे मिळण्यासाठी त्यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केला. पैसे मंजूर करून देण्यासाठी सराटे यांनी तक्रारदारांना कडून चार हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष लास लाचेच्या मागणीची पडताळणी केली, तेव्हा सराटे ने पुन्हा चार हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोड करत अडीच हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला पकडण्यासाठी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून सराटे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडून लाचेचे अडीच हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांच्यासह पोलिस निरीक्षक दिपाली निकम, बाळासाहेब राठोड, सुनील पाटील यांनी केली.