कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे महात्मा गांधी पुतळ्याखाली आज मूकआंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने सत्तेचा चुकीचा वापर करून राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई ही निषेधार्थ आहे. आगामी काळात भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवराज मोरे यांनी दिला.
कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज करण्यात आलेल्या मुक आंदोलनामध्ये सातारा जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण युवक तालुकाध्यक्ष दिग्विजय पाटील, कराड उत्तर युवक तालुका अध्यक्ष सुरज पवार, दिग्विजय सूर्यवंशी, कराड शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांच्यासह युवक काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिवराज मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेमध्ये राहुलजी गांधी यांना मिळालेला प्रतिसाद, त्यांनी भारत जोडण्यासाठी केलेला प्रयत्न आणि संसदेत अदानी व मोदी यांचे असलेले संबंध याबाबत त्यांनी जेव्हा प्रश्न मांडला. यासह राहुल गांधी यांना या देशात मिळणारी लोकप्रियता याला पाहून कुठे यती भाजप सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न भाजप सरकारच्या माध्यमातून केला गेला.
राहुल गांधीवरील कारवाईचा कराडात युवक काँग्रेसतर्फे निषेध
कोल्हापूर नाक्यावर काळ्या फिती लावून मूक आंदोलन pic.twitter.com/7DUsZOJq5T
— santosh gurav (@santosh29590931) March 25, 2023
पण एवढंच सांगायचं आहे कि आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून आज आंदोलन करत आहे. पण येणाऱ्या काळात आमचं आंदोलन तीव्र होईल. राहुल गांधीजींचा आवाज हा देशातील १४० कोटी जनतेचा आवाज आहे. जेव्हा आपण १४० कोटी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा देश मोदी सरकारला देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ हा भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. या देशामधून भाजप हद्दपार केल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नसल्याचे शिवराज मोरे यांनी सांगितले.