सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात गोडोली तळे परिसरात धर्मवीर श्री. छ. संभाजीराजे यांचा पुतळा बसवण्याची मागणी शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने नगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्यास पालिकेने मंजुरी दिली असून हा विषय धोरणात्मक असल्याने जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी असून या शहरामध्ये श्री. छ. शिवाजी महाराज यांचे वंशज वास्तव्यास आहेत. ऐतिहासिक शहर असलेल्या साता-यामध्ये श्री. छ. शिवाजीमहाराज यांचा पुतळा आहे. मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्री. छ. संभाजीराजे यांचा पुतळा तसेच स्मारक अद्याप कुठेही नाही, हे क्लेशदायक आहे. स्वराज्याचे रक्षण करणा-या छत्रपतींचे स्मारक साता-यात व्हावे, ही शिवभक्तांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्याबाबत धर्मवीर श्री. छ. संभाजीराजे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने पालिकेकडे गोडोली तळयाचे परिसरात प्रवेशव्दाराजवळ त्यांच्या कर्तृत्वास शोभेल असा पुतळा अथवा स्मारक उभारण्यात यावा. याबाबतीत योग्य त्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला घेऊन त्वरित प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
त्याबाबत पालिकेने मागणीची दखल घेऊन पुतळा बसवण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरीय समितीकडे मान्यता घेण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली असल्याचे म्हटले आहे. याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगरपालिका प्रशासन यांचे शाहूनगरी फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.