हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. यंदा 24 एप्रिल रोजी सचिनचा 50 वा वाढदिवस असून यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याला खास गिफ्ट देणार आहे. MCA कडून वानखेडे स्टेडियमवर सचिनचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणाही असोशियनने केली आहे.
या पुतळ्याचे अनावरण या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते. वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आलेला हा पहिलाच पुतळा असेल. सचिनच्या पुतळ्यासाठी जागाही निश्तित कऱण्यात आली आहे. त्यानुसार, एमसीए लाउंज बाहेर वर्तुळाकार आकारात हा पुतळा उभारण्यात येईल. सचिन वयाची 50 वर्ष पूर्ण करत असताना हा पुतळा उभारण्यात येणार आहे, ही नक्कीच त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावाने एक स्टँड वानखेडेवर आहे.
दरम्यान, एमसीएच्या या घोषणेनंतर माझ्यासाठी हे मोठं गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया सचिनने दिली आहे. याच मैदानातून माझा प्रवास सुरु झाला. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी मुंबईकडून क्रिकेट खेळतोय. कधीही मी विसरू शकत नाही अशा अनेक आठवणी या मैदानासोबत आहेत. येथेच मला आचरेकर गुरूंनी क्रिकेट शिकवलं आणि माझी रिटायरमेंट सुद्धा माझी इथेच झाली. याशिवाय 2011 विश्वचषक सुद्धा याच मैदानावर जिंकला होता अशी आठवण सचिनने सांगितली.