हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या बागेश्वर बाबा यांचा तीन दिवसीय कार्यक्रम पुण्यातील संगमवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. परंतु या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोन गटात तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. मंगळवारी स्वयंसेवक आणि भक्तांमध्ये हाणामारी झाल्यामुळे कार्यक्रमास्थळी गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप नोंदवत वाद मिटवला. परंतु या वादामुळे कार्यक्रमास्थळी भक्तांना चेंगरा चेंगरीचाही सामना करावा लागला.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस पुण्यामध्ये बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी बागेश्वर बाबा मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी भक्तांची भली मोठी रांग लागली होती. मात्र, याचवेळी भक्तांमध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली. परिणामी त्यांच्यातला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी येऊन भक्त आणि स्वयंसेवकांमधील हा वाद मिटवला. परंतु अद्याप त्यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद सुरू झाला होता हे समजले नाही.
दरम्यान, मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर येथे देखील बागेश्वर धाम बाबा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांच्या या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र विरोध दर्शवला होता. बागेश्वर बाबा आपल्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा पसरवतात असा आरोप करत समितीने कार्यक्रम घेण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. मुख्य म्हणजे, यापूर्वी बागेश्वर बाबा यांनी तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती. या वक्तव्यामुळे बागेश्वर धाम बाबा चांगलेच चर्चेत आले होते.




