हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातील आरोपी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (सध्या रा. डेक्कन जिमखाना) या जाधव बंधुंच्या हजारमाची गावातील घरावर आज छापा टाकण्यात आला. पुण्याच्या उपवनसंरक्षकांच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली. यामध्ये त्यांना घरात हरीण, भेकर, चिंकारा, रागगव्याची शिंगे आढळून आली ती त्यांनी जप्त केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातून जाधव बंधूंविरुद्ध यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भातील जबाबावेळी जाधव बंधुंकडे बिबट्याचे कातडे असल्याची माहिती महिलेने दिली होती. तसेच वन विभागाकडेही तक्रार केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी पसार होते.
बिबट्याची केली होती शिकार
बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव खडकवासला धरणालगतच्या मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार वन विभागाच्या छाप्यात उघडकीस आला होता. त्यावेळी वन विभागाने बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला होता. याप्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (दोघे रा. डेक्कन जिमखाना) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जप्त अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार
वन्यजीवांचे जप्त केलेले अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ यांच्या पथकाने विश्वजीत जाधव आणि अभिजित जाधव यांच्या मूळगाव असलेल्या हजारमाची (ता. कराड) येथील घरावर टाकलेल्या छाप्यात मोठे घबाड हाती लागले आहे.
बिबट्याचे कातडे बनावट
हजारमाचीतील कारवाईमध्ये वन्यजीवांच्या शिंगांबरोबरच बिबट्याचे कातडेही आढळले आहे. मात्र, ते कातडे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात संशयित आरोपींनी आपल्याकडे शिंगे बाळगण्याचा परवाना असल्याचा दावा केला आहे. त्याची सत्यताही पडताळली जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली.