हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातील मावळ तालुक्याच्या चांदखेड येथे भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. दवाखान्यातील काम संपवून घरी परतताना कार ओढ्यात कोसळल्याने डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय 42) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. सत्यजित नवाडे हे रविवारी रात्री आपल्या दवाखान्यातील काम संपून पुन्हा घरी निघाले होते. यादरम्यान रात्र असल्याने रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे डॉ. सत्यजित नवाडे वेगाने गाडी चालवत होते. याचवेळी चांदखेड गावाजवळ आले असताना त्यांची सुसाट गाडी थेट ओढ्यात जाऊन कोसळली. यामुळे मोठा आवाज देखील झाला. पुढे गावकऱ्यांनी ओढ्याजवळ येऊन पाहिल्यानंतर त्यांना एक गाडी ओढ्यात पडलेली दिसली. त्यांनी लगेच ही गाडी ओढ्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न सुरू केले. तसेच, डॉ. सत्यजित नवाडे यांना देखील गाडीतून बाहेर काढले. यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना दिली.
त्याचबरोबर, डॉ. सत्यजित नवाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु डॉ. सत्यजित नवाडे यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिली. दरम्यान, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, अजय मुन्हे, अनिश गराडे, कृष्णा गायकवाड अशा अनेक लोकांनी मिळून डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे यांची गाडी ओढ्यातून बाहेर काढली. तसेच, डॉ. सत्यजित यांना रुग्णालयात नेले. परंतु त्यापूर्वीच डॉ. सत्यजित यांचा मृत्यू झाला होता.