हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. परंतु या दसरा मेळाव्यातून घरी परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री अडीज दोन वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ घडला. या भीषण अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
एकाचा मृत्यू
काल रात्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आले होते त्याचबरोबर काही कार्यकर्ते हे औरंगाबाद येथून तीन ते चार बस घेऊन आले होते. मेळावा संपून हे कार्यकर्ते माघारी जात असताना त्यांच्या तीन बसचा मुंबई आग्रा मार्गावर अपघात झाला. या दुर्घटनेत काही कार्यकर्ते जखमी देखील झाले. तर एकाला आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर, तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला जोरात धडकला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बस देखील एकमेकांना धडकल्या. ज्यामुळे ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून पुलाखालील रस्त्यावर कोसळली. या घटनेत इतर दोन बसचे देखील मोठे नुकसान झाले. तर 6 ते 7 कार्यकर्ते या अपघातात जखमी झाले. तसेच, एकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरुळीत करून जखमींना उपचारासाठी हलवले.