सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- पुणे महामार्गवर वारकऱ्यांच्या ट्रकला आज मंगळवारी दि. 21 रोजी पहाटे साडेचार वाजता झालेल्या भीषण अपघातात एक वारकरी ठार तर चारजण जखमी झाले आहेत. ट्रकमधील वारकरी हे सांगली जिल्ह्यातील असून ते पंढरपूरला वारीसाठी जाण्यासाठी आळंदी येथे निघालेले होते. ट्रकचा पाठीमागील टायर फुटल्याने पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोची धडक दिलेली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर सातारा तालुक्याच्या हद्दीत रायगाव येथे 48 वारकऱ्यांच्या ट्रकचा क्र. (एमएच- 11- एएल- 5673) भीषण अपघात झाला. गाैरीशंकर काॅलेजच्या जवळ टायर फुटल्याने हा अपघात झाला. यावेळी पाठीमागून आलेला आयशर टेम्पोने क्र. (एमएच- 46- बीबी- 2241) धडक दिली. धडकेत भिमराव कोंडीबा जगताप (वय- 65) या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. तर नंदू पवार, अशोक मोहिते, मारूती माने, संजय शिरतोडे हे जखमी झाले आहेत.
अपघातातील सर्व वारकरी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील असून वै. सोपानकाका देहूकर यांची दिंडी आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक चाैधरी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.