सोलापूर | पंढरपूर शहरात चोरांची दहशत निर्माण झाली आहे. अशातच चोरटय़ांनी आता इथे येणाऱ्या भाविकांना लक्ष केले आहे. येथील आग्री धर्मशाळेत मुक्कामी आलेल्या भाविकांना चोरांनी चांगलाच दणका दिला आहे. 60 हजार रुपये रोख रक्कमेसह 4 लाख 36 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे भाविकांमध्ये हतबल झाले आहेत.
पालघर जिल्ह्यातील जांभुळवाडा येथील भाविक सचिन चिंतामण माळवी हे आपल्या कुटुंबीयासह दोन दिवसा पूर्वी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. चंद्रभागा काठावरील आगरी धर्मशाळेत ते मुक्कामास थांबले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी त्यांची पत्नी चंद्रभागा नदीमध्ये स्नानास गेली. मात्र जाताना त्यांनी दरवाजा अर्धवट उघडाच ठेवला होता.
याचाच गैरफायदा घेत अज्ञात चोरटय़ाने त्यांच्या खोलीत प्रवेश करून एक बॅग लंपास केली. दरम्यान साडेपाच वाजता माळवी यांच्या पत्नी धर्म शाळेतील खोलीत परत आल्या असता खुंटीला अडकवलेली बॅग लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पती सचिन माळवी यांना झोपेतून उठविले व बॅगेचा शोध घेतला. या वेळी चोरी झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या बॅगेमधून चोरटय़ाने रोख ६० हजार रुपये, २ लाख ४० हजार रुपये किमतीची पाच तोळे सोन्याची चेन, ९६ हजार रुपये किमतीच्या एक तोळय़ाच्या दोन अंगठय़ा, २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व १५ हजार रुपये किमतीचे हातातील घडय़ाळ असा एकूण ४ लाख ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या बाबत सचिन साळवी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पंढरीत दर्शनासाठी भाविक मोठय़ा श्रद्धेने येतात. मात्र आता येणाऱ्या भाविकांना वेगळय़ाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने, पर्स आदींच्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या. आता त्या पुढे जाऊन चोरटय़ांनी भाविक ज्या धर्मशाळेत उतरतात तेथे जाऊन चोरी करण्याचे धाडस केले. पोलिसांनी आगरी धर्मशाळेत लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये सदर चोर आत प्रवेश करीत असल्याचे तसेच हातात बॅग घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे. या बाबत पोलीस तपास करीत आहेत अशी माहिती अरूण पवार पोलिस निरीक्षक पंढरपूर यांनी दिली आहे.