कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
वाढदिवसाच्या कार्यक्रमात धारदार कोयत्याच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे घडली. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास युवकाच्या खुनानंतर संशयित फरार झाला असून राजवर्धन महादेव पाटील (वय 24, रा.जुळेवाडी ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास काही युवकांकडून वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी अचानकपणे राजवर्धन पाटील याच्यावर धारदार कोयत्याने एका युवकाने हल्ला केला. या हल्ल्यात राजवर्धनचा मृत्यू झाला.
अचानकपणे झालेल्या या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी असलेला संशयित विजय बाबुराव काशीद हा पळून गेला. युवकावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे व खुनाचे कारण अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. याबाबत खून झालेल्या युवकाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.