इंचलकरंजीत क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मध्यरात्री युवकाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | इंचलकरंजी येथे क्रिकेटचा सामना संपल्यानंतर तीन बत्ती चाैकात उभ्या असलेल्या मित्रावर दोन मित्रांनी चाकूसारख्या हत्याराने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. राहुल बाबू दियाळू (वय- 22, रा. कामगार चाळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका रेकॉर्डवरील संशयितांसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंचलकरंजी शहरातील कामगार चाळ परिसरात राहणारा राहुल हा खासगी ठिकाणी साफसफाईचे काम करत होता. मध्यरात्री क्रिकेटचा सामना संपल्यानंतर तो काही मित्रांसोबत तीन बत्ती चौक परिसरात थांबला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच दोघा मित्रांनी त्याच्यावर चाकू सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राहुल याचा दोघा मित्रांशी आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याचबरोबर रविवारी सायंकाळी पुन्हा वाद उफाळून आला. या रागातूनच त्याचा खून करण्यात आल्‍याचा पोलिसांचा संशय आहे.

याबाबतची माहिती कळताच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री पंचनामा करण्यात आला. सकाळी इंदिरा गांधी सामान्य रूग्‍णालयात शवविच्छेदनाचे काम सुरू होते. याबाबतची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळी तसेच इंदिरा गांधी सामान्य रूग्‍णालयात भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.