हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार असताना मुंबईने तब्बल ५ वेळा आयपीएल जिंकली मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालील पहिल्याच मोसमात मुंबईला साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे सर्वच स्तरातून हार्दिक पंड्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात आता ३६० प्लेयर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलिअर्सची (AB de Villiers) सुद्धा भर पडली आहे. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदात अहंकार दिसतोय असा आरोप करत एबीने सनसनाटी निर्माण केलीय. तो स्वत:ला धोनीसारखा कूल आणि कंपोज्ड समजतो, पण तसे नाही असेही डिव्हिलिअर्सने म्हंटल.
यूट्यूब चॅनलवर बोलताना एबी डिव्हिलियर्सने म्हंटल, हार्दिक पांड्याची कर्णधारपदाची शैली खूपच धाडसी आहे, त्यामध्ये अहंकार दिसतोय. मला वाटत नाही की तो मैदानावर ज्या पद्धतीने वागतो तो नेहमीच खरा असतो, परंतु त्याने ठरवले आहे की हीच त्याची कर्णधारपदाची शैली आहे. हार्दिक धोनीसारखंच शांत असल्याचे दाखवत असतो. हार्दिकचा नेतृत्वाचा दृष्टीकोन हा गुजरात टायटन्सचा कर्णधार असताना योग्य वाटतं होता कारण गुजरातकडे त्यावेळी युवा खेळाडूंचा संघ होता, मात्र मुंबई इंडियन्समध्ये मात्र तस नाही .. मुंबईकडे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांना हा दृष्टीकोन मान्य नसतो ….
यावेळी डिव्हिलियर्स आपली जुनी आठवण सुद्धा सांगितली. मला ग्रॅम स्मिथ आठवतो. त्यावेळी एक युवा म्हणून मला फक्त त्यांना फॉलो करावे लागले. परंतु इकडे एक रोहित आहे, बुमराह आहे जे म्हणतात कि तु फक्त शांत रहा, सामना कसा जिंकायचा याबद्दल सांग, आम्हाला बढाई मारण्याची गरज नाही असं म्हणत एबी डिव्हिलिअर्सने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह केलं.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला हा संघ पॉईंट टेबल मध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत मुंबईने एकूण १२ सामने खेळले आहेत. त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला असून ८ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ५ वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला यंदा साजेशी कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्याचे सुमार नेतृत्व मुंबईच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे.