अबब ! तब्बल 54 अब्ज 53 कोटींचा कृती आराखडा

औरंगाबाद – मागेल त्याला काम देणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 2022-23 मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांनी तब्बल 2 लाख 93 हजार 540 विकास कामे सुचविली आहेत. या कामांसाठी 54 अब्ज 53 कोटी 11 लाख 47 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. अब्जावधींचा कृती आराखड्याला मंजुरी घेणाऱ्या जि.प.ने जिल्ह्यात मग्रारोहयोचे गतवर्षी केवळ 61 कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

वन विभागाने 13 हजार 641 कामे प्रस्तावित केली. सामाजिक वनीकरण विभागाने 7 हजार 19 कामे, बांधकाम विभागाने 35 हजार 923 कामे, कृषी विभागाने 51 हजार 223 कामे, रेशीम विभागाने 5 हजार 898 कामे, सिंचन विभागाने 12 हजार 823 कामे, जिल्ह्यातील 868 ग्रामपंचायतींनी 1 लाख 57 हजार 666 कामे तर पशुसंवर्धन विभागाने 9 हजार 347 कामे प्रस्तावित केली आहेत.

या कामांसाठी अकुशल मजुरांवर 34 अब्ज 16 कोटी 70 लाख 60 हजार रुपये, तर अकुशल कामावर 20 अब्ज 36 कोटी 40 लाख 87 हजार रुपये अशी एकूण 54 अब्ज 53 कोटींची कामे प्रस्तावित आहेत.