औरंगाबाद प्रतिनिधी | दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना वर्ग वैजापूर तालुक्यात आजही अस्तित्वात आहे असे म्हणत भाऊराव पाटील यांचे पुतणे अभय पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाऊसाहेब पाटील यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने पक्षाला वैजापूर मतदारसंघातून उमेदवारी देताना गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसाच्या सभेत सांगितले होते कि आगामी निवडणुकीला पक्षातील तरुणकार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा असणार आहे. शरद पवार यांच्या या विधानाने भल्या भल्यांच्या अंगावर काटे आले होते. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार त्यानंतर आपल्या मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या तरुण कार्यकत्यांना शांत बसवण्याच्या कामाला लागला. मात्र काही आमदारांच्या घरातीलच तरुण आमदार होण्यास इच्छुक आहेत. त्यांना कसे रोखायचे असा प्रश्न आमदारांना भेडसावू लागला आहे.
दरम्यान अभय पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी वाढवल्या असून त्यांना स्व:ताला देखील निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा आहे. अभय पाटील यांना जर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर आमदार भाऊराव पाटील अपक्ष उभा राहणार का? हा देखील प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. असे झाल्यास बीड सारखीच चुलत्या पुतण्याची लढाई वैजापूरमध्ये देखील रंगणार यात दुमत नाही. अभय पाटील यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे म्हणाले आहे. मात्र ते देखील अपक्ष उभा राहू शकतात असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.