हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून अभिजीत बिचुकले यांनी देखील प्रतिक्रिया देताना आपला संताप व्यक्त केला आहे. जर महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद लवकर थांबवला नाही तर मी सुद्धा कर्नाटकात जाणार आहे आणि तिथे जाऊन आंदोलन करणार आहे असं म्हंटल आहे.
सध्या महाराष्ट्रात आणि देशात घाणेरड्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे. राज्यात आणि देशात एकाच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मार्गी लावावा. जर महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. मी देखील छत्रपती संभाजीराजेंसोबत कर्नाटकात जाणार असून तिथे आंदोलन करणार आहे असं बिचुकले यांनी म्हंटल.
दरम्यान, गेल्या काही दिवसात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं जात आहे. त्यावर बोलताना बिचुकले म्हणाले, विकृत मनोवृत्तीची लोक जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरत आहेत पण आम्ही हे खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसात मी रस्त्यावर उतरून याबाबत त्या नेत्यांना जाब विचारणार आहे असेही ते म्हणाले.