सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शहरातील रिक्षाचालकाचा मुलगा दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सुमित धारासिंग साळुंखे याची निवड झाली आहे. सुमित साताऱ्यातील एलबीएस महाविद्यालयाचा हा विद्यार्थी एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र पथकाचा कमांडर म्हणून राज्याचा बॅनर घेऊन पंतप्रधान रॅलीत सर्वांत पुढे चालणार आहे. सुमितच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा सुमित साळुंखे हा विद्यार्थी आहे. या निवडीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून विविध आठ कॅम्पमधून अत्यंत खडतर प्रशिक्षण व निवड चाचणीमधून त्याची महाराष्ट्रातील अंतिम 34 सैनिकांमध्ये निवड झाली आहे. यावर्षी तो 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा या बटालियनमधून तो ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देत आहे.
सुमितच्या या यशासाठी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एम. ठोंगे, कर्नल पराग गुप्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी मार्गदर्शन केले. एन. सी. सी. अधिकारी प्रा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सुभेदार मेजर उदय पवार, ट्रेनिंग जेसीओ दीपक शिंदे, हवालदार यशवंत पवार यांनी सुमितच्या प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.