औरंगाबाद प्रतिनिधी | अंतिम वर्ष परीक्षा संदर्भात ठाकरे सरकार व मंत्री उदय सामंत हे सर्वोच्च न्यायालयात तोंडावर पडले आहेत. राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ चालवला आहे. राज्यात उच्च व तंत्रशिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. यामुळे अभाविप उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
अंतिम वर्ष परीक्षा संदर्भात उदय सामंत व युवासेना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता सुचवलेल्या परीक्षा पद्धतीने परीक्षा येत्या काळात घेण्यात याव्यात. प्रथम व द्वितीय व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. राज्यातील सर्व महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे तसेच शासकीय विद्यापीठांचे 30 टक्के शैक्षणिक शुल्क राज्य सरकारने माफ करावे. चुकीच्या लागलेल्या निकालांचे तात्काळ पुनर्मुल्यांकन करण्यात यावे. तसेच खाजगी विद्यापीठाच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा किंवा खाजगी विद्यापीठे हे शुल्क निर्धारण समितीच्या अंतर्गत घेण्यात यावे. या मागण्यांसाठी अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर अभाविप धडक मोर्चा करणार असल्याचे स्वप्नील बेगडे यांनी सांगितले. तसेच, सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागील पाच निवडणुकांमधील आपल्या आवेदन पत्रात दरवेळी वेगवेगळी शैक्षणिक अहर्ता दर्शविली आहे. यामुळे सत्तार यांनी निवडणूक आयोग व जनतेची दिशाभूल केली आहे. या विरोधात अभाविपने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. जर अब्दुल सत्तार यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले नही, तर अभाविप राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’