औरंगाबाद – शिक्षण क्षेत्रात सध्या राजकीय हस्तक्षेप वाढत आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती वाटते गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक गोष्टीला अधिक महत्त्व दिले जाते त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक नुकसान होत असून या विरोधात जनमानसाने लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले.
विद्यापीठ सुधारणा कायदा 2016 मध्ये महाविकास आघाडी सरकारने कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी कायद्यांमध्ये बदल केला आहे. या निर्णयाबद्दल शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी, पदवीधर, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत यांना काय वाटते त्यांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी विद्यापीठ विकास मंचने राउण्ड टेबल कॉन्फरन्समध्ये आयोजन केले. विद्यापीठ कायद्यामध्ये होऊ घातलेला बदल हा अतिशय घातक आहे. यामुळे विद्यापीठ क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठा राजकीय हस्तक्षेप वाढेल, विद्यापीठांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता ढासळेल, विद्यापीठे हे गुत्तेदार यांच्याकडे बनतील अशी रोखठोक भूमिका मान्यवरांनी मांडली. तसेच शिक्षण तज्ञ व सर्व स्तरावरील शैक्षणिक नियुक्त्यांमध्ये प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता बोलून दाखवली.
दरम्यान या विरोधात समाजात जागृती करण्यासाठी विद्यापीठ विकास मंच मोठ्या प्रमाणात अभियान उघडणार, असे विद्यापीठ विकास मंच महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. गजानन सानप यांनी जाहीर केले.