औरंगाबाद – औरंगाबाद- जळगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून वाळू भरण्यासाठी जाणारे टिप्पर व काळीपिवळी टॅक्सीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. शेख सलीम शेख रहीम (40, रा. स्नेहनगर), सय्यद कासिम सय्यद लियाकत (36, रा. ईदगाह नगर सिल्लोड) व अन्य एक अनोळखी अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळी मात्र रात्री १०:०० वाजेपर्यंत सुद्धा पोलीस हजर झाले नव्हते.
औरंगाबादहून सिल्लोडकडे येणारी काळी – पिवळी टॅक्सी (एम एच 20 डी एफ 0092) आणि केऱ्हाळा येथील पूर्णा पात्रात वाळू भरण्यासाठी भरधाव वेगाने जाणारा टिप्पर (एम एच 21 एक्स 3951) यांच्यात रात्री ८ वाजेच्या सुमारास चिंचखेडा येथे हॉटेल फोरसिझन समोर जोरदार धडक झाली. भीषण अपघात दोन्ही वाहनांनी तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या बाजूला पडली होती. दोन्ही वाहनांचे दोन तुकडे होऊन इतरत्र पडले होते. यावेळी महामार्गावर मात्र काचेचा सडा पडलेला होता.