औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – धूळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड जवळील माळीवाडीनजीक मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.

यासंबंधी अधिक माहीती अशी, बीडकडून भरधाव वेगात औरंगाबादकडे ही कार जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील कारची माळेवाडीजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. यात कारचालक प्रशांत नारायण शिंदे (वय 28, रा.लिंबाला, ता. जितूंर, परभणी) यांच्या छातीला मार लागुन गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या कारमधील अंकुश उचित बढे (वय 37, रा नूतन कॉलनी, बीड) यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी झाले. मात्र उर्वरित जखमींची नावे समजु शकली नाहीत. एवढेच नव्हे तर जखमी व मृत कोणत्या कारमधील आहेत हे मदतकार्य करणाऱ्याच्याही स्मरणात राहिले नाही. मृत व जखमीच्या खिशात असणाऱ्या ओळख पत्रावरून त्याचे नावे समजली. रस्त्याने जाणाऱ्या माळीवाडी येथील नागरिकांनी हा अपघात प्रत्यक्षरित्या पाहुन माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचोड व अंबड पोलिसांना कळविले. तर काहींनी माळीवाडी येथील पथकर नाक्यावरील रूग्णवाहिकाला दुरध्वनीवरून माहिती दिली.

माहीती मिळताच रूग्णवाहिका चालक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविले. हा अपघात घडल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी होऊन महामार्गावर जवळपास अर्धातास वाहतूक खोळंबुन दूरपर्यत रांगा लागल्या होत्या. घटनेनंतर बऱ्याच काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वाहने बाजुला घेऊन वाहतूक सुरळीत केली. रस्त्याचे चौपदरीकरण होऊनही दररोज या रस्त्यावर माळीवाडी, रोहिलागड, मुरमा, डोणगाव, आडगाव, आडुळ, चित्तेपिंपळगाव या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच असुन हे अपघातप्रवणस्थळ मृत्यूचे सापळे म्हणुन परिचित होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अद्याप या ठिकाणी कोणतेही सांकेतिक फलक न लावल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment