सांगली | आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील एकाच कुटुंबातील दोन सख्खे, एक चुलत भाऊ आणि त्यांचा कुत्राही कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची रविवारी दि. 6 जूनला घटना घडली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या भांवडापैकी एकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला असून कुत्रा लुशीचाही मृत्यू झाला आहे. परंतु यांच्या मृत्यू कसा झाला, यांचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. रात्री उशिरा घटनास्थळी पाणबुडे दाखल झाले असून सोमवारी सकाळपासून मुलांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे. तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. त्याच्यालगतच अंकुश व्हनमाने व लहू व्हनमाने या दोन सख्ख्या भावांची शेतजमीन आहे. लगतच कालव्यातून पाणी वाहते. रविवारी दुपारी तीनला घरातील कुत्रे सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने (वय १६), आनंदा अंकुश व्हनमाने (१५) हे सख्खे आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने (१७) गेले होते. सायंकाळी सहापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय, शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली.
रात्री आठला घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्यालगत विजय आणि आनंदा यांचे कपडे आणि चपला आढळल्या. त्यांच्याबरोबर नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. एक बादली, त्याला बांधलेला दोरही सापडला. वैभवची माहिती मिळाली नाही. गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली आहे. रात्री साडेआठला घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक, पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे दाखल झाले. पोलिस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह जादा व वेगात असल्याने मुलांचा तपास लागला नाही. दरम्यान, सांगलीहून पाण्यात बुडून शोध घेणारे पाणबुडे दाखल झाले आहेत. त्यांनी अंधारातच मुलांचा शोध सुरू केला. या घटनेने गावात आणि तालुक्यात खळबळ उडाली.