औरंगाबाद – जेजुरीहून दर्शन करून जळगावकडे जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीला अचानक समोर आलेल्या कार धडकल्याने झालेल्या अपघातात क्रूझरमधील 11 जण जखमी झाले.सर्व जखमी एकाच कुटुंबातील होते. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 च्या दरम्यान छावणी भागातील लोखंडी पुला जवळ घडली. अपघातानंतर कारचालक जखमींची मदत करण्याऐवजी वाहन सोडून पसार झाला होता. कार्तिकी ज्ञानेश्वर दुढे (वय-4 वर्षे), वात्सलबाई काशीनाथ गावंडे (वय-65), भगवान काशीनाथ गावंडे, कविता सुनील क्षीरसागर (वय-28), गजानन भगवान गावंडे (वय-26), सविता भगवान गावंडे (वय-45), संगीता भगवान गावंडे (वय-18), रत्ना गजानन गावंडे (वय-18), कांताबाई रघुनाथ सोनवणे, ज्ञानेश्वर राजीव दुढे (वय-35), ज्योती ज्ञानेश्वर दुढे अशी जखमींची नावे आहे.
या अपघात प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच गावंडे कुटुंबात विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे गावंडे कुटुंब व नातेवाईक दर्शनासाठी (एम.एच.19 बी.यु.4461) या क्रूझरने जेजुरी येथे गेले होते. दर्शन करून पुन्हा ते जळगावकडे जात असताना शुक्रवारी पहाटे 3 च्या सुमारास छावणी भागातील लोखंडीपुला जवळ होलीक्रॉस शाळेच्या बाजूने (एम.एच.20 इ.जे.1313) या क्र.ब्रेझा कार भरधाव वेगात येऊन क्रूझरला धडकली. क्रूझरच्या चालकांचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर पलटी झाली.
अपघात होताच ब्रेझाकारचा चालक पसार झाला. या घटने प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.