सातारा जिल्ह्यातील आणखी एका जवानाचा अपघाती मृत्यू

Jawan Mayur Yadav News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील वडूज येथील जवानाचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयुर जयवंत यादव (वय २९) असे या जवानाचे नाव असून त्याच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारासोबत जात असताना स्पीड ब्रेकरवरून जवान मयुर जयवंत यादव हे खाली पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला (पंजाब) येथील दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जवान मयुर यादव यांचे पार्थिव आज मंगळवारी वडूजमध्ये आणण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडूज येथील जवान मयुर जयवंत यादव हे 145 बटालियनमध्ये लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. अंबाला (पंजाब) येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारांसोबत जात होते. जोडीदारासोबत जात असताना त्यांची मोटारसायकल स्पीड ब्रेकरवरून गेली. अचानक तोल गेल्यामुळे मयुर हे मोटारसायकलवरून खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी अंबाला (पंजाब) येथील दवाखान्यात दाखल केले होते.

उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत जवान मयुर यादव यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच वडूज शहरासह विद्यालयावर शोककळा पसरली होती. मृत जवान मयुर यादव यांच्या पश्चात वडील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक जयवंत यादव, आई, भाऊ हर्षद, पत्नी, तीन वर्षांची आदविता ही मुलगी आहे. अंबाला (पंजाब) येथून त्यांचे पार्थिव दिल्लीतून विमानाने पुणे येथील विमानतळावर मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत पोहचणार आहे. पुणे येथून वाहनाने वडूजमध्ये दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव पोहोचेल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.