कराड | पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिह्यातील शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्यास कराड पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा अटक केली. तीन जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. शेखर शेकाप्पा पुजारी (वय- 62, रा. जवाहरनगर खार ईस्ट, मुंबई) असे चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस गुरूवारी रात्री गस्त घालताना पोलिसांनी संबधीत चोरट्यास गजाआड केले आहे. त्याच्याकडून कराड शहरातील पाच शाळांच्या चोऱ्या उघडकीस आल्यानंतर अन्य जिल्ह्यातील चोऱ्यांची कबुली त्याने दिली. गेल्या 20 वर्षांपासून शाळांना टार्गेट करून संशयित शेखर पुजारी चोऱ्या करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
फौजदार प्रदीप जाधव हे रात्रगस्त घालत होते. त्यावेळी त्यांना शेखर पुजारी हा संशयीतरित्या फिरताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे पोलिसांना स्क्रू ड्रयव्हर, हेक्सा ब्लेडसारखे साहित्य सापडल्याने पोलिसांची शंका बळावली. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. विठामाता हायस्कूलमध्ये झालेल्या चोरीतील सीसीटिव्ही फुटेजवरून त्यांनी छायाचित्रे काढली होती. चौकशीला आणलेल्या पुजारीशी ती साधर्म्य दाखवत होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली.
त्यावेळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. फौजदार भापकर यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांना त्याची माहिती दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्य चोऱ्यांचा तपास केला. त्यावेळी कराडसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 28 शाळांची कार्यालये फोडून तेथून चोऱ्यांची कबुली त्याने दिली. शहरातील विठामाता, आदर्श प्राथमिक शाळा, शिवाजी हायस्कूल, टिळक हायस्कूलमध्ये चोऱ्यांची कबुली देत तेथे चोऱ्या कशा पद्धतीने केल्यायाचीही त्याने कबुली दिली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील चोऱ्यांच्या तपासासाठी पोलिस पथक त्याच्यासह जयसिंगपूरला रवाना झाले आहे. पुजारी हा सराईत संशयीत असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.