औरंगाबाद – सीसीटीव्ही फुटेज मध्ये आलेल्या दोघांपैकी एका मित्राला बोलते करण्यास सिडको पोलिसांना यश मिळाल्यामुळे तब्बल चोवीस दिवसानंतर टीव्ही सेंटर येथील खुनाचा उलगडा झाला. आरोपी अयाज खान बशीर खान (36) यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील स्टेडियमच्या पायऱ्या खाली 20 जानेवारीच्या मध्यरात्री सिद्धार्थ भगवान साळवे याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला होता. खुनाचा उलगडा करण्यासाठी सिडको ठाणे, गुन्हे, सायबर शाखा कामाला लागल्या होत्या. तरीही उलगडा होत नसल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी ठाण्याला भेट देत आढावा घेतला. घटनेच्या रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात अयाज खान बशीर खान असल्याची पुष्टी मिळाली.
मृत सिद्धार्थने जेसीबी चालक अयाज याच दारू पिऊन शिवीगाळ केली. त्यावरून वाद झाले. अयाजने सिद्धार्थला दांड्याने मारले. सिद्धार्थ स्टेडियमच्या पायऱ्यांच्या खालील मोकळ्या जागेकडे पळाला. अयाजही तेथे गेला. त्याने सिद्धार्थच्या डोक्यात दगड घातला. पहिल्या फटक्यात मेल्यामुळे त्याने मृतदेह जाळण्यासाठी पेटवला. त्यानंतर तो निघून गेला. हा सर्व प्रकार मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. ही सर्व घटना स्टेडियमच्या पायाखाली झोपणाऱ्या अयाजच्या मित्राने पाहिली. तो घाबरून पळून घरी गेला. शेवटी त्यानेच दिलेल्या माहितीमुळे खुनाचा उलगडा झाला.