खटाव | पांढरवाडी (ता. खटाव) गावच्या हद्दीतील जुगार अड्डयावर सातारा आणि पुसेगाव पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. पोलिसांनी 14 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेत 22 जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांना पांढरवाडी येथील प्रदीप नलवडे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये सागर काटकर (रा. ललगुण) हा बेकायदेशीर जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. सातारा व पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सदर ठिकाणी छापा टाकला. पोल्ट्री शेडमध्ये 22 जण तीन पानी जुगार खेळताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी 23 हजार 910 रुपये रोख, 18 मोबाईल हँडसेट्स, 4 चारचाकी, 9 दुचाकी वाहने, 6 तलवारी असा एकूण 13 लाख 98 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांनी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रदीप नलवडे, सागर काटकर, राहुल जाधव, दयानंद गोसावी, गणेश कांबळे, केशव वाघ, जोतीराम कुंभार, कुंदन पवार, सुरज शिंदे, अजय घाडगे, सचिन कांबळे, तानाजी कुंकाले, मंगेश यशवदे, सुरज निंबाळकर, मयुर कदम, अमोल कांबळे, अंकुश बनसोडे, विवेकानंद जाधव, मारुती जाधव, दिगंबर पवार, अंकुश अहिवळे, महादेव शिंदे या 22 जणांवर कारवाई केली. या गुन्ह्याची फिर्याद चंद्रहार खाडे यांनी दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे करत आहेत.