कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बंगळूर महामार्गावरील विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ उडाली. विना हेल्मेट वाहन चालकांवर यापुढेही कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील खोडशी येथे कराड वाहतूक शाखेच्या वतीने विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत तब्बल 40 विना हेल्मेट वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कराड वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी सरोजिनी पाटील व त्यांच्या पथकाने महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली. महामार्गावर पोलिसांची कारवाई होत असल्याचे पाहून अनेक वाहन चालकांची पळापळ झाली. तर बहुसंख्य वाहन चालकांनी वाहने पाठीमागे वळवून राॅंग साईडने निघून जाण्याचा प्रयत्न केला. तर काही वाहन चालकांनी सेवा रस्त्याचा आसरा घेत पलायन केले.
वाहतूक शाखेने केलेल्या या अचानक कारवाईमुळे दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहन चालकांनी स्वतःचे अपघातांपासून रक्षण करण्यासाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन यावेळी सरोजिनी पाटील यांनी केले.