हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र भाजप – शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चा रंगत असतात. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजप- सेना मैत्री बाबत विचारले असता त्यांनी रोखठोक उत्तर देत या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, भाजपकडून सातत्याने अन्यायाची वागणूक येतेय. जर आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे, असे सांगत आगामी काळातील भाजपसोबत मैत्रीचा विषय आदित्य ठाकरेंनी संपवला.
राजकीय षडयंत्र सुरू आह, बिगर भाजप राज्यात सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला जात आहे. पण टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत घाणेरडं राजकारण थांबला पाहिजे. हातात राज्याची सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून हे सुरू आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.