हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज गोव्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी गोव्याची शान धनुष्यबाण असा नवा नारा दिला
शिवसेना आणि गोव्याचं एक वेगळं नातं आहे. आम्ही येथे फक्त निवडणुकीसाठी आलो नाहीत तर गोव्यातील स्थानिकांना न्याय देण्यासाठी आलो आहे असे म्हणत गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना रणांगणात उतरली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र मॉडेल घेऊन शिवसेना रणांगणात उतरणार आहे असेही ते म्हणाले
यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा झाला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. गोव्यातील स्थानिकांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गोव्याचा विकास होताना दुर्दैवाने पर्यावरणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे गेल्या दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा असा सवाल उपस्थित करत भाजपवर टीका केली
दरम्यान, गोव्यात यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आहे . शिवसेनेने पेडणे, शिवोली, म्हापसा, साखळी, मांद्रे, हळदोणा, पर्ये, वाळपई, वास्को, केपे आणि कुठ्ठाळी या 11 मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे गोव्यात शिवसेनेला नक्की किती यश मिळणार हे पाहावं लागेल