टीम हॅलो महाराष्ट्र । सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असं आदित्य ठाकरे यांनी आता स्पष्टीकरण दिल आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावत इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असं म्हटलं आहे.
कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता दिला आहे.
इंदिरा गांधी यांच्या वक्तव्यावरून आधीच काँग्रेस नेते संजय राऊत यांच्यावर भडकले असताना राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुढं करत शिवसेनेच्या अडचणीत भर घातला आहे. शिवसेना काँग्रेससोबत राज्यात सरकार चालवत असताना काँग्रेसचा सावरकांना भारतरत्न देण्याबाबत विरोध पाहता राऊत यांचे वक्तव्य शिवसेनेला अडचणीत आणणारे सध्यातरी दिसत आहे. दरम्यान आदित्य ठाकरे राऊत यांच्या वक्तव्यावर त्याच वैयक्तिक मत असल्याच सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.