हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “थोडी जरी लाज, हिंमत शिल्लक असेल तर तर आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवावे,” अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
शिवसैनिकांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिवसेनेशी बंडखोरी करत अनेक आमदार बाहेर पडले. त्यांच्यावर टीका करण्यासाठी अथवा आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो नाही. जे निघून गेले ते निघून गेले, आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत, जे लवकरच कळतील,”असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
“एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते. त्यांना यातच आनंद मिळतो की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले. आणि दुसरा गट असा आहे की, ज्याला पळवूननेण्यात आले आहे. याबाबत आपल्याला लवकरच समजेल. मागील पंधरा दिवसांपासून मी जे बघत आलेलो आहे. ते सगळं दु:ख दायकच आहे. मी प्रत्येक शाखेत आणि ज्या मतदारसंघात जात आहे तिथे मी एवढंच पाहत आहे की जे पळून गेले ते पळून गेले पण सर्वसाधारण शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच उभा असे असे मला पहायला मिळत आहे,” असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.