सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जागतिक वारसा लाभलेल्या कास पुष्प पठार म्हणजे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. यामुळे या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक फिरायला येतात. पण याच जागतिक वारसा स्थळाला खालसा करण्याचे काम धनदांडग्यानी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी परवानगी नसताना देखील प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असलेलं दिसते. प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून कास परिसरात आणि सातारा कास रस्त्यांवर बेकायदेशीर बांधकामांचे डोंगर उभारले आहेत.
कास पठारावर प्रशासनाच्या डोळ्यांदेखत जागतिक वारसास्थळ या धनदांडग्याकडून खालसा करण्याचे काम सुरू आहेच. त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिकांच्या नरड्यावर पाय ठेवून मोठं मोठाले इमले बांधण्याचं काम सुरू आहे. यामुळे स्थानिकांच्या व्यवसायांवर यांचा खूप मोठा परिणाम झाला आहे. तरी देखील महसूल प्रशासन वनविभाग मूग गिळून गप्प का बसले आहे? अनेक तक्रारी असताना शासनाची बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर जर अनाधिकृत बांधकामे होत आहेत. तरीदेखील प्रशासन गप्पं असल्याने जागतिक वारसा स्थळ आता अनाधिकृत बांधकामांचे स्थळ बनलय. त्याचं बरोबर कासपठार परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून बेकायदेशीर प्लॉट तयार होत असताना देखील सातारच्या तहसीलदार गप्प का?
जागतिक वारसास्थळ वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी तरी पुढं येणार का ? अनाधिकृत बांधकाम हटाव आणि जागतिक वारसास्थळ बचाव म्हणण्याची वेळा आता आलेली आहे. पर्यावरण प्रेमी नेहमीच अग्रेसर भूमिका घेताना दिसतात, ते आता कुठे गायब झाले असा सवालही स्थानिकांच्यातून केला जात आहे.