कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेचा पंचवार्षिक कार्यकालाची मुदत संपली असून आता नगरपालिकेच्या कारभाराची सुत्रे प्रशासनाच्या हातात जाणार आहेत. अद्याप प्रशासकाची कार्यवाही झालेली नाही, कधी येईल सांगता येत नाही. तोपर्यंत पुढचा आदेश मिळेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांची भूमिका चालूच राहील. पूर्वी घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी सुरू झाली असे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.
मागील पाच वर्ष कराड नगरपालिकेत भाजपाच्या जनतेतून निवडूण आलेल्या नगराध्यक्षा अध्यक्षस्थानी होत्या. तर भाजपा, राजेंद्रसिंह यादव गट, जयवंत पाटील गट, जनशक्ती कॉंग्रेस अशा सदस्यांनी मिळून सत्ता स्थापन केली. तर लोकशाही आघाडी विरोधी बाकावर बसले. मागच्या पाचवर्षात अनेक घडामोडींनी कराड नगरपालिकेत राजकीय संघर्ष पहायला मिळाला. आता कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाने सर्व दालनांचा ताबा घेतला आहे. काही दिवस प्रशासन कराड नगरपालिकेचे कारभारी म्हणून काम पाहणार आहेत. मात्र त्यानंतर निवडणूकीच्या रणधुमाळीनंतर नवी सत्ताधारी नगरपालिकेत येणार आहेत. पण ते नवे सत्ताधारी कोण हे येणा-या काळातच पाहायला मिळेल.
सध्या पालिकेचा कार्यकाल संपलेला असल्याने प्रशासक काम पाहणार आहे. मात्र, अद्याप प्रशासक नेमलेला नाही, त्यामुळे आता मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हातात पालिकेची सूत्रे राहणार आहेत. कराड नगरपालिकेचा पंचावार्षिक कार्यकाल 26 डिसेंबर 2021 रोजी संपला आहे.