औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश शुक्रवारी प्रशासकांकडून देण्यात आले आहे. या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाई करण्यात येणार असून महिनाभर ही कारवाई मोहीम सुरु राहणार आहे. या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगर पालिकेकडून वाहने जप्त करावी. असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहे.
शुक्रवारी महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या दालनात रस्त्याच्या कडेला उभी असलेली बिनकामी आणि भंगार वाहने जप्त करण्यासंबंधी महानगरपालिका, आरटीओ, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी बी.बी .नेमाने, रविंद्र निकम, कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुरेश वानखेडे, सहाय्यक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, मनपा कार्यकारी अभियंता रस्ते बी .डी .फड, कार्यकारी अभियंता वाहने डी. के. पंडित, महानगरपालिकेचे सर्व वार्ड अधिकारी व वार्ड अभियंता ,पद निर्देशित अधिकारी व अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘रस्त्याच्या कडेला बेवारस व भंगार वाहने उभे करून वाहतुकीस तसेच साफसफाई कामात अडथळा निर्माण होत आहे. गॅरेज, भंगार, वाहनधारकास सात दिवसाची नोटीस बजावण्यात येऊन सात दिवसात वाहने न उचलल्यास सात दिवसानंतर हे वाहने जप्त केले जाईल.’ असे आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले. या वाहनांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गाडी नंबरसह अहवालाची सीडी तयार करा आणि मनपा उपायुक्त यांच्याकडे पाठवा, तसेच पंधरा दिवसानंतर हा अहवाल आरटीओ यांना पाठवून या वाहनाचा आणि वाहनधारकाचा वाहन नोंदणी परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात यावी. या बिनकामी भंगार वाहनामुळे नागरिकांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा संबंधीत वार्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.