अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी दाम्पत्यास यंदाचा मेरी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांमधील आदिवासींचे अधिकार आणि शिक्षण याविषयी आनोखी कामगिरी करणारे अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी यांना मेरी पाटील स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा चौथा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयातील घैसास सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार डॉ. राजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे यावेळी व्याख्यानही होणार असून यास उपस्थित राहाण्याचे आवाहन शब्द पब्लिकेशन आणि मुक्त शब्द मासिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

अत्यंत दुर्धर आजाराशी लढत असतानाही सामाजिक कार्यकर्त्या मेरी पाटील यांनी बोरिवली नँशनल पार्क परिसरातील आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीदिनी आदिवासी समाजासाठी शैक्षणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव केला जातो. आतापर्यंत मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील आधारशीला संस्थेचे अमित आणि जयश्री (२०१५), दंतेवाडा, छत्तीसगड येथील सोनी सोरी (२०१६) आणि कीम, सुरत येथील उत्तमभाई परमार (२०१६) यांना या पुरस्काराने सन्मिनित करण्यात आले आहे. या निमित्ताने मेरी पाटील स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. आतापर्यंत व्ही. गीता (२०१५), बेझवाडा विल्सन (२०१६), डॉ. आनंद तेलतुंबडे (२०१७) यांची या प्रसंगी व्याख्याने झाली आहेत.
यंदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या अत्यंत मागासलेल्या आणि आव्हानात्मक तालुक्यात काम करणाऱ्या अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी या दाम्पत्याची मेरी पाटील स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अँड सुरेखा दळवी, राहूल कोसम्बी आणि डॉ.हरिश्चंद्र थोरात यांच्या समितीने ही निवड केली आहे.
माडिया या अतिमागास आदिवासी जमातीतील पहिले वकील, ग्रामसभांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले पहिले लोकप्रतिनिधी आणि ग्रामसभा सक्षम करण्यासाठी झटणारे अँड लालसू नोगोटी आणि नक्षलींनी वडिलांची हत्या केल्यानंतरही खचून न जाता, आदिवासींच्या शिक्षणाचे काम सुरू ठेवणाऱ्या, माडिया भाषेत पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करणाऱ्या उज्ज्वला बोगामी या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आदिवासींसाठी कार्यरत दाम्पत्याच्या या अनोख्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. ग्रामसभांचे सक्षमीकरण, आदिवासी स्वशासन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन आणि सक्षमीकरण या विषयांवर नोगोटी आणि बोगामी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. त्यासाठी या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.

Leave a Comment