सोलापूर प्रतिनिधी । ऍड. राजेश कांबळे यांचा सोन्याचे दागिने लुटण्यासाठी खून करण्यात आला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली आहे. अॅड. कांबळे खून खटल्यात हजर होण्यासाठी उज्वल निकम हे विशेष सरकारी वकील मंगळवारी जिल्हा न्यायालयात येणार आहेत. अॅड. कांबळे खून खटल्यात अॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी सोलापूर बार असोसिएशनने आणिअॅड. राजेश कांबळे यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली होती.
त्यानुसार शासनाने अॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. हा खटला त्यांच्याकडे दिल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर होणार आहेत. सुनावणीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. ८ जून २०१९ रोजी डोक्यात हातोडी मारून कांबळे यांचा खून केला होता. दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सत्तूर आणून पाच तुकडे केले होते. मृतदेहाचे तुकडे विल्हेवाट लावण्यासाठी पिशवीत भरून नेण्यात येणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिस घटनास्थळी पोचले होते.
खुनानंतर कांबळे यांचे सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले होते. या खून प्रकरणात बंटी खरटमल, मुख्य सूत्रधार ऍड. सुरेश तारू चव्हाण, सराफ श्रीनिवास येलदी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. सराफ येलदी यास उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला असून खरटमल आणि अॅड. चव्हाण हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.