हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत मोठी घडामोड घडली आहे. पापुआ न्यू गिनीला (AFG Vs PNG) हरवून अफगाणिस्तानच्या संघाने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. ७ गडी राखून अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयाने न्यूझीलंडच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरलं असून किवी स्पर्धेबाहेर गेले (NZ Out Of T20 World Cup 2024) आहेत. ग्रुप C मधून आता वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या २ संघानी सुपर ८ मध्ये आपलं स्थान पक्के केलं आहे.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे पार पडलेल्या या सामन्यात राशिद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुलनेने खूप हलक्या असलेल्या पापुआ न्यू गिनीचा अफगाणी गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही आणि अवघ्या ९५ धावांत त्यांचा संघ गुंडाळला. यानंतर ७६ धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या अफगाणिस्तानने ७ गडी राखून आरामात विजय मिळवला आणि सुपर ८ चे तिकीट मिळवलं. ग्रुप C मधून वेस्ट इंडिजने आधीच सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तान सुपर ८ मध्ये गेलाय.
अफगाणिस्तानमुळे ग्रुप C मध्ये चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता आधीपासूच वाटत होती. त्यात त्यांनी न्यूझीलंडचा दारुण पराभव केल्यानंतर तर मोठी खळबळ उडाली होती. दुसरीकडे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ सुद्धा तुफान फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजने सुद्धा न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला होता, त्यामुळे पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय मिळवताच रशीद खानचा संघ सुपर ८ मध्ये आपलं स्थान पक्के करणार हे नक्की होत.. आणि झालंही अगदी तसेच .. अफगाणिस्तानने तीनपैकी सर्व तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकले तरी त्यांना सुपर-८ ची फेरी गाठता येणार नाही. अशा प्रकारे किवी संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.