काबूल । अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान एका बाजूला सरकार बनवण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे, वॉरलॉर्ड्सना शोधून शोधून पकडले जात आहे. वॉरलॉर्ड्स इस्माईल खानला तालिबान्यांनी पहिल्यांदा पकडले. आता त्यांच्या सैनिकांनी अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर सलीमा मजारी यांना ताब्यात घेतले आहे. मजारी या बल्ख प्रांतातील चारकिंट जिल्ह्याच्या गव्हर्नर आहेत. तालिबानशी लढण्यासाठी त्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले होते आणि त्यांनी स्वतः देखील शस्त्र घेतले होते. सलीमा शेवटच्या क्षणापर्यंत तालिबानचा सामना करत राहिल्या.
वॉरलॉर्ड्स त्यांना म्हंटले जाते ज्यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेच्या मदतीने स्वतःला तयार केले आणि तालिबानशी उघडपणे लढा दिला.
तालिबानशी खंबीरपणे लढा
जेव्हा अफगाणिस्तानात तालिबान्यांचा नरसंहार सुरु झाला होता आणि बाकीचे नेते पळून जात होते किंवा शरण येत होते, तेव्हा एक महिला गव्हर्नर सलीमा मजारी आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य जमवत होत्या. त्या लोकांना सोबत येण्याचे आवाहन करत होत्या. सलीमाने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी तालिबानचा खंबीरपणे सामना केला. पकडल्या जाईपर्यंत त्यांनी बंदूक उचलून आपल्या लोकांचे रक्षण केले.
त्यांच्या सैन्यातील लोकं त्यांची जमीन आणि गुरे विकत होते आणि शस्त्रे विकत घेऊन त्यांच्या सैन्यात सामील होत होते. सलीमा मजारी स्वतः पिकअपच्या पुढच्या सीटवर बसायच्या आणि लोकांना तिच्या सैन्यात सामील होण्यास सांगण्यासाठी ठिकठिकाणी जायच्या.
निर्वासित म्हणून इराणमध्ये जन्म
अफगाण वंशाच्या सलीमा माजरी सोव्हिएत युद्धातून पळून गेल्यानंतर इराणमध्ये आल्या. येथे त्यांचा जन्म 1980 मध्ये निर्वासित म्हणून झाला. तेहरान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानला परतण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये, त्यांना कळले की, चारकिंट जिल्ह्याच्या गव्हर्नर पदासाठी जागा रिकामी आहे. ही त्यांची वडिलोपार्जित जन्मभूमी होती, म्हणून त्यांनी या पदासाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांची गव्हर्नर पदी निवड झाली. तालिबानचा धोका लक्षात घेऊन आणि जिल्हा सुरक्षित करण्यासाठी त्यांनी सुरक्षा आयोगाची स्थापना केली, जी स्थानिक सैन्याच्या भरतीवर लक्ष ठेवायची.